Edited version of this article was published in महाराष्ट्र टाइम्स, Pune edition on 12th May 2012 under title - "उंच पिग्मिचा युगांडा".
कामा निम्मित युगांडामध्ये सहा महिने राहिलो, त्या दरम्यान मला जे अनुभव आले, जो युगांडा मी पहिला त्यावरून मला असे वाटते की, प्रत्येकाने हा देश पाहावा.
प्रथम दर्शन आपल्या मनावर एक चित्र उमटवते, आणि या देशाचे ते चित्र खूपच छान आहे. मला विमानतळावरून घेण्यासाठी, माझ्या सहकार्याने गाडी सांगितली होती. गाडीचा वाहन चालक वेळेवर न आल्यामुळे मी वाट बघत उभा होतो. त्या दरम्यान बर्याच जणांनी मला टॅक्सी बद्दल विचारले. मी सांगितले की मी माझ्या गाडीची वाट बघतो आहे. त्यातल्या एकाने (दुसर्या टॅक्सीचा चालक) मला माझ्या वाहन चालकाचे नाव विचारले. मी नाव सांगितल्यावर त्याने त्याला फोन केला आणि मला सांगितले की अजून पाच मिनिटात तुमची गाडी येईल. गाडी आल्यावर त्याने मला सांगितले की - ती बघा तुमची गाडी. माझ्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता त्याने हे काम केले होते. सध्या पुण्यातील रिक्षा किंवा इतर विमानतळांवर उतरल्यावर येणार्या टॅक्सी चालकांच्या अनुभवापेक्षा वेगळा हा अनुभव बरेच काही चांगले सांगून गेला.
उत्तर प्रदेशाएवढे क्षेत्रफळ असलेल्या या देशाचा दक्षिण भाग खुपच निसर्गरम्य आहे. या भागात वर्षातील आठ महिने पाउस पडतो. त्यामुळे हिरवागार असा हा प्रदेश आहे. अजून खूप मोठ्या प्रमाणावर जंगले टिकून आहेत. अनेक प्रकारचे जंगली प्राणी - सिंह, हत्ती, वेगवेगळ्या प्रकारची हरणे, पाणघोडे, झेबरा, खूप प्रकारचे पक्षी, इथे बघायला मिळतात.
जगातील तिसर्या क्रमांकाचे गोड्या (हिमाचल प्रदेशपेक्षा थोडे मोठे) पाण्याचे तळे असलेल्या विक्टोरीया लेकचा काही भाग युगांडा मध्ये आहे. बाकीचा भाग - केनिया आणि टांझानियामध्ये आहे.
याच लेकमधून जिंजा या ठिकाणी नाईल नदी उगम पावते असे मानले जाते. नदीच्या उगमाकडे बोटितुन जाताना अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. उगमाच्या इथे महात्मा गांधींचा पुतळा आहे. उगमाच्या खाली बूजागली इथे नाईल नदी एका धबधब्याचा रूपात खाली येते. इथे धबधब्याची उंची फार नाही, पण पाण्याचे प्रमाण खूपच असल्यामुळे, बघताना भीती वाटते.
या दोन्ही ठिकाणी स्थानिक कलाकार आपली कला - मुख्यतः नाच करून दाखवतात.
हिच नाईल नदी पुढे गेल्यावर - मरचीसन फॉल इथे फक्त सात मीटरच्या चिंचोळ्या जागेतून 45 मीटर खाली पडते. हा धबधबा कोठूनही पूर्णपणे बघता येत नाही. तीन / चार वेगवेगळ्या ठिकाणाहून बघावे लागते. उडणार्या तुषारांनी दिवसभर इंद्रधनुष्य दिसत राहते.
जंगले आणि जंगली प्राणी आम्ही तीन वेगवेगळ्या राष्ट्रीय उद्यानामध्ये बघितले. मी राहत असलेल्या म्बरारा (Mbarara) जवळचे राष्ट्रीय उद्यान (Lake Mburo) हे सवाना गवताळ प्रदेशातील सर्वात लहान (सुमारे 260 वर्ग किलोमीटर) उद्यान आहे.
या उद्यानात झेब्रा, अनेक प्रकारची हरणे, माकडे, बबुन, क्रेन हे पक्षी आहेत. सकाळी किंवा संद्याकाळी या जंगलात फिरण्यासाठी आपण आपली गाडी घेऊन जाउ शकतो. येथील लेकमध्ये पाण घोडे, मगरी, अनेक प्रकारचे पक्षी बघता येतात.
क्वीन एलिज़बेत राष्ट्रीय उद्यान हत्ती, सिंह, अनेक प्रकारची हरणे, बबुन, पाण घोडे, पक्षी यासाठी प्रसिद्ध आहे. तर मरचीसन फॉल रास्ट्रीय उद्यान हे सगळ्यात मोठे (3840 वर्ग किलोमीटर) जंगल असून इथेही हे सगळे प्राणी, पक्षी आहेत, त्याच बरोबर इथे जिराफही आहेत. या ठिकाणी नाईल नदी मधून 2 / 3 तास चक्कर मारणे म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे - मरचीसन फॉल्सचे खालच्या बाजूने दर्शन.
रिफ्ट व्हॅलीचा भाग असलेला, दक्षिण पश्चिम युगांडा म्हणजे अनेक तलावांचा प्रदेश. सर्वात उल्लेखनीय म्हणजे - कबाले शहराजवळील लेक बूनयोनी. हा लेक समुद्रसपाटी पासून सुमारे 2000 मीटर उंचीवर आहे. इंग्रजी Y आकरातील या लेक मध्ये 29 छोटी छोटी बेटे आहेत. या सर्व बेटांवर बोटीमधूनच सगळे व्यवहार होतात. जवळच्या पर्वतावरुन या लेकचे दृष्य फार छान दिसते. आम्ही रहात असलेले हॉटेल हे पर्वतावर असल्यामुळे, सकाळी धूक्यातून हळू हळू बाहेर येणारे तळे पाहून भान हरकून जाते.
या लेकमधून एक तास बोटितुन प्रवास करून आपण एका टोकाला पोहचतो. त्या ठिकाणी आम्ही पिगमी लोकांनी केलेले पारंपारिक नृत्य बघितले. पारंपरिक नाच, छान असला तरी पिगमीना बघून निराशा झाली. पिगमी माणसे म्हणजे बुटकी माणसे असे आपण भूगोलात शिकलो आहे, पण ही माणसे तर चांगली पाच फुट उंच होती. चौकशी केल्यावर कळले की खाण्यातील, आणि एकूण जीवनमानातील बदल, इतर जमातिंशी आलेला संबंध इत्यादीमुळे त्यांच्या उंचीवर परिणाम झाला आहे.
बूनयोनी लेक मधील अनेक बेटंपैकी - punishment island - हे एक बेट. पुर्वी (साधारण पाने 1950 पुर्वी) लग्नाआधी अनैतिक वर्तन करणार्या (फक्त) मुलीला शिक्षा म्हणून इथे आणून सोडायचे. आजही या बेटावर काहीही नाही - झाडेपण नाहीत. त्यामुळे पुर्वी मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
युगांडा मध्ये प्रवास करताना आम्ही दोन ठिकाणी विषुवृत्त ओलांडले. हा एक संस्मरणीय अनुभव होता. दोन गोलार्धात पाय ठेवून फोटो काढण्याचा अनुभव घेतला. या ठिकाणी एक प्रयोग बघितला. भोक पडलेल्या घमेल्यातून पाणी खाली पडताना दक्षिण गोलार्धात ते घडाळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेने पडते तर उत्तर गोलार्धात ते काट्याच्या दिशेने फिरते, पण विषुवृत्तवर मात्र ते सरळ खाली जाते.
युगांडामध्ये अनेक भारतीय, आणि भारतीय हॉटेल्स आहेत, त्यामुळे जेवणाचा त्रास झाला नाही. एके ठिकाणी आम्ही स्थानिक जेवणचा अनुभव घेण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो होतो. जेवणात मुख्यत्वे उकडलेले कच्चे केळे, उकडलेली रताळी, कसावा (ज्यापासून साबूदाणा केला जातो) आणि बटाटे, भात, आणि एक कालवण असते. कालवण म्हणजे पातळ सुपासारखे पाणी आणि त्यात मासाचा तुकडा. काही प्रमाणात हिरव्या भाज्याही असतात. या कालवणा बरोबर शेंगादाण्याची पेस्ट. आपल्याकडे ज्या प्रमाणे भात, गहू किंवा ज्वारी हे मुख्य अन्न आहे, त्याप्रमाणे तिथे केळे हे एक मुख्य अन्न आहे. मक्याच्या कणसाप्रमाणे भाजलेली केळी तिथे स्नॅक्स म्हणून खाल्ली जातात. रस्त्यावर केल्यांचे असंख्य घड विक्रीसाठी असतात. अनेक ट्रक्समधून त्यांची वाहतूक होत असते.
आमच्या या पूर्ण प्रवासात, आम्ही एक गाडी केली होती, त्याचा ड्राइवर कम गाइड याचा आम्हाला खूप छान अनुभव आला. तो आमच्या बरोबर सर्व ठिकाणी येत होता, अगदी खरेदी करताना घासाघिस घालण्यासाठी सुद्धा. या लेखाच्या सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे सगळीकडे असाच अनुभव आला.
"बुगांडा" राजवटीच्या नावावरून युगांडा हे नाव पडलेला हा देश बर्याच लोकांना हुकुमशहा "ईदी अमीन" मुळे माहिती असेल, पण तो सर्व इतिहास झाला. एक नवीन युगांडा बघण्यासाठी भेट द्यायलाच हवी.